अशा माता ज्यांनी जग बदललं:जिजाऊ Mothers who changed the world: Jijau

‘आई ‘ अशी आपल्याला मुलानी हाक मारली की आपल्याला किती छान वाटतं नाही का? पण ह्या दोन अक्षरांत नुसताच गोडवा नाही तर सामर्थ्यही दडलंय हे काही मातांच्या रूपात आपल्याला दिसतं. त्यांनी ते ओळखलं आणि आजमावलही. अशाच मातांची भेट आपण ‘अशा माता ज्यांनी जग बदललं ‘ह्या नवीन सदरात घेणार आहोत. खुप दिवसापासून ही नवीन सिरिज लिहावी असं डोक्यात होतं.लिहायला घेतली तेव्हा पाहिलं नाव मनात आलं ते म्हणजे जिजाऊंच.हो जिजाऊ म्हणजे जिजामाता. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्याची आई -जिजाई.

“हे राज्य व्हावे अशी श्रींची इच्छा आहे “असं म्हणत कोवळ्या वयात मूठभर मावळ्यांना बरोबर घेऊन शपथ घेणाऱ्या शिवरायांच्या मनगटात एवढं साहस आलं कुठून?? तर ते दिलं जिजाऊंनी. आपल्याला मुलाच्या मनात परक्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःच राज्य उभं कर हे बीज पेरणारी जिजाऊ ही किती दूरदृष्टी असलेली, मनस्वी आणि खंबीर आई होती हे राजांचं आयुष्य पाहिलं की लक्षात येतं. आज आपल्याकडे “शिवाजी जन्माला आला पाहिजे, पण आपल्याकडे नको, दुसऱ्यांच्या घरी.” अशी म्हण आपण ऐकतो. पण जिजाऊंना असं कधी वाटलं नाही. उलट आपल्या पोटी जन्माला येणारं मूल पुढे इतिहासाची दिशा बदलेल, परकीयांच्या जुलूमातून जनतेला मुक्त करेल असा विचार करणारी ती द्रष्टी स्त्री होती.

जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडला लखूजी जाधवांच्या घरी झाला. लखूजी जाधव हे जिजाऊंचे पिता स्वतः मराठा सरदार होते. जिजाऊंचा लवकरच शहाजीराजे भोसले ह्यांच्याशीविवाह झाला. पुढे काही दिवसांनी ह्या दोन घराण्याचे संबंध फारसे काही टिकले नाहीत. आणि जिजाऊंना माहेर दुरावलं.हे सगळं पाहत, तत्कालीन मोगलांच्या लढाया व अत्याचार ह्यांनी अस्थिर झालेल्या जगात जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला.त्यांच्यावर रामायण, महाभारतातील गोष्टी सांगून हिंदवी स्वराज्य स्थापनेचे संस्कार घडवले. तेही अशा काळात जेव्हा सारं जग परकीयांच्या गुलामीत अंधारलं होतं. पण ह्या आईने आपल्या मुलाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत मात्र तेवत ठेवली.

स्वभावाने करारी असणाऱ्या जिजाऊंनी राजांच्या डोळ्यात नुसतीच मोठी स्वप्न पेरली नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठीचं बळ ही त्यांच्या पंखात भरलं. मग ते राज्यकारभाराचे प्रशिक्षण असो वा न्यायनिवाडा करण्याचे धडे. माणसांची पारख करणं आणि त्याच्यावर विश्वास टाकणं ह्या सगळ्यामध्ये जिजाऊंचा मोठा वाटा आहे.त्यामुळे स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकणारी माणसं उभी करण्यात शिवरायांना यश मिळालं.राजांच्या अनुपस्थितीत जिजाऊच स्वराज्याच्या अनेकप्रसंगी आधार बनल्या.

शिवरायांचे आणि जिजाऊंचं नातं हे अगदी आदर्श होतं. सगळ्या महत्वाच्या निर्णयात शिवराय त्यांचा सल्ला घेत आणि त्यादेखील शिवरायांनी घेतलेल्या निर्णयाबाबत विश्वास टाकत. राजांचं चरित्र बघता जिजाऊ ह्या कायम त्यांच्यासाठी भक्कम आधारच बनल्या. राजांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात पंचेचाळीस वर्षे जिजाऊंनी त्यांना साथ दिली. शेवटच्या काळात प्रकृतीमुळे जिजाऊ रायगडावर न राहता पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी राहत असतानादेखील रायगडावरून जिजाऊंचे वस्तीस्थान दिसेल अशी तजवीज करण्यात आली होती. असे सांगतात ठराविक प्रहारी जिजाऊ बाहेर येतं आणि राजे त्यांना मुजरा करत.

आजही जिजाऊ ह्या सगळ्यांसाठी वंदनीय आहेत.त्यांच्या नावाची अनेक स्मृतीस्थळ आहेत. युगपुरुष नुसतेच जन्माला येत नाहीत तर ते घडवावे लागतात हे आपणास कुणी शिकवलं असेल तर जिजाऊंनी. त्यांच्या अथक कष्टातूनच श्रीमानयोगी असणाऱ्या छत्रपती शिवरायांचे आयुष्य साकार झाले आणि इतिहासात महाराष्ट्राची दिशा बदलली.अशा ह्या गौरवी मातेस आपलं त्रिवार वंदन!!!!

अशाच आणखी काही माता आणि त्यांच्या गोष्टी आपण ह्या सदरात घेऊन येणार आहोत. तोपर्यंत वाचत राहा आईपण!!

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!