श्रावण महिन्यातील सण

माझी आजी कायम सांगायची  श्रावणातील प्रत्येक दिवसाला महत्व आहे अगदी श्रावणी सोमवार पासून ते येणाऱ्या शनिवार पर्यंत .श्रावण म्हटलं कि उपास ,व्रत ,वैकल्ये आलीच .मग खास पदार्थ देखील आले .अगदी शुक्रवारी घालाव्या लागणाऱ्या पुरणापासून नागपंचमीला केल्याजाणाऱ्या दिंडांपर्यंत .सगळं काही खास आणि सगळं काही वेगळं!!!

मग श्रावण महिन्यातच ह्या गोष्टींना का इतके महत्व ???श्रावण हा खास आणि वेगळा का ??

श्रावण महिन्यात निसर्ग हा अल्हाददायक आहे .ऊन पावसाने बहरलेला तो श्रावण म्हणूनच श्रावण आला कि सगळे आनंदित असतात .अगदी पशु पक्ष्यांपासून ते झाडवेलींपर्यंत पर्यावरण बहरलेले दिसते.मराठी कॅलेन्डरमध्ये पण १२ महिने असून त्यात श्रावण लागला कि सणांची सुरुवात होते आणि येणारे गणपती आपल्याला खुणावू लागतात .आताच फेसबुक वरच्या ग्रुप्स मध्ये गणपतीची सजावट ,दागिने ह्याच्या जाहिरातींची रेलचेल जाणवू लागली असेल .आजकालच्या पिढीला यथासांग सण साजरे करणं जमत नसलं तरी ती तिच्या परीने जसं जमेल तसं आपली संस्कृती जपायचा नक्कीच प्रयत्न करते .अगदी अमेरिकेत सुद्धा ह्या दिवसात महाराष्टीयन महिला वर्गांचे कार्यक्रम होताना दिसतात .मग अजूनही आहे कि नाही श्रावण खास सगळ्यांसाठी !!

नागपंचमी

श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांमध्ये नागपंचमी हा सण नक्कीच विशेष आहे .माझ्या आठवणीतल्या श्रावणात नागपंचमी आली कि त्या दिवशी शाळेत कार्यक्रम असे ,खासकरून कल्पना साडी नेसून शाळेत जायला मिळे तेव्हा त्या गोष्टीचे खास कौतुक वाटे .आवरून सावरून शाळेत जाण्याचे जे थोडेफार संधी येत त्यात नागपंचमी हि एक नक्कीच असायची .ह्या दिवशी आईने केलेले गोड दिंड खायला फार अप्रूप वाटे .तर कसा करतात हा सण साजरा ते पाहू .

ह्या सणाला गावाकडील स्त्रिया नागाच्या वारुळावर जाऊन दूध ठेवतात व नागाची मनोभावे प्रार्थना करतात .किंवा पाटावर हळद चंदनाचे नाग काढून आघाडा दुर्वा वाहून  त्यांची पूजा करतात .आणि दूध ल्याहाचं  नैवेद्य दाखवतात.ह्या दिवशी पुरणाचे दिंड ,वरण भात,बटाटा भाजी असा स्वयंपाक करतात .आणि त्या  दिवशी शेतात नांगरणी करत नाही .कारण फाळाखाली  साप येऊ नयेत किंवा त्यांची बिळे बुजू नयेत अशी ह्या मागची भावना असते .नाग हा काही अंशी शेतकऱ्याचा मित्र हि समजला जातो कारण शेतातील उंदीर व इतर छोटे उपद्रव करणारे प्राणी खाऊन तो गुजराण करतो आणि शेतीस नुकसानीपासून वाचवतो .

आपल्याकडे स्त्रिया फक्त नागदेवतेची पूजा करत नाहीत तर त्या दिवशी कहाणी देखील करतात .आणि नागोबास माहेरचा समजून आपली माहेरील मंडळी सुखी राहू दे अशी प्राथर्ना करतात .

मंगळागौर :

“हासरा नाचरा श्रावण आला” हे म्हणतात ते काही खोटं नाही अगदी खरं आहे .अगदी परंपरेनुसार देखील आपल्या जुन्या पिढ्यांनी ते जपायचा पूर्ण प्रयत्न केला आहे.त्याचा एक भाग म्हणजे मंगळागौर.नवीन लग्न झालेल्या सुवासिनींनी पाच वर्ष मंगळागौरीची पूजा करण्याची प्रथा आहे .आपल्याकडे शिव आणि पार्वती ह्यांना गृहस्थाश्रमाचा आदर्श मानतात.त्यामुळे आपला संसार हा देखील त्यांच्या नुसार सुखी व्हावा त्यामुळे मंगळागौर म्हणजे पार्वतीची शंकरासह पूजा करण्याची प्रथा आहे .सकाळी अंघोळ करून पत्री जमा करावी व लग्नात आणलेली अन्नपूर्णा पत्रींची पिंड करून त्यासह स्थापन करावी अशी पद्धत आहे .व त्याची मनोभावे पूजा करून मंगळागौरीकडे पुरणाचा नैवेद्य घालून एकवेळ उपवास करावा.आणि आरती व कहाणी करावी अशी सर्व साधारण पद्धत आहे .काही ठिकाणी भटजी बोलवून पूजा करतात .पाच सवाष्णी एकत्र येतात.नवी नवरी असेल तर मंगळा गौरीचे खेळ खेळतात .काही ठिकाणी मंगळागौर जागवतात.अर्थातच पूर्वीच्या काळात सर्व बायकांना social होता यावं .त्यांना केवळ घर आणि दार ह्यातून बाहेर पडून खेळ खेळता यावे ,जरा मोकळीक मिळावी ,समवयस्क लाभावे म्हणून अशा काही गोष्टींची तरतूद.आजकाल प्रत्येकालाच सगळं शक्य होतच असं नाही .पण जो तो आपल्या परीने संस्कृती जपायचा प्रयत्न करत असतो .काही ठिकाणी सामूहिक मंगळागौर करतात .काही ठिकाणी आवड म्हणून बायकांचे ग्रुप जातात व खेळ मांडला जातो .काही स्त्रिया केवळ पूजा आणि उपवास करतात .प्रत्येकाची पद्धत वेगळी .पण अशी हि मंगळागौर श्रावणात येणाऱ्या मंगळवारी पूजिली जाते .लग्नानंतर पहिली पाच वर्ष आणि मग नंतर तिचं उद्यापन केलं जातं.

जिवंतिका म्हणजेच जिवती पूजन :

श्रावणात शुक्रवारी सवाष्ण घालण्याची किंवा हळदीकुंकू करण्याची काही घरात प्रथा हि असतेच.पण त्याबरोबर आणखी एक गोष्ट सगळेजण करतात ते म्हणजे जिवंतिका पूजन म्हणजे जिवतीची पूजा.मग हि जिवतीची पूजा कशी बरे करतात ??

जिवतीची कागद म्हणजेच जिवतीचा फोटो मिळतो .श्रावण आला कि साधारण जिवतीचा कागद म्हणजे जिवतीचा फोटो लावण्याची पद्धत असते .लेकुरवाळ्या स्त्रिया जिवतीची पूजा करतात .हि पूजा चार हि शुक्रवारी करावी अशी पद्धत आहे .आपल्याला मुलांच्या रक्षणासाठी जिवतीची पूजा केली जाते.जिवतील हळद कुंकू वाहून व तिच्या व फोटोतील मुलांच्या तोंडाला साखर लावून तिची मनोभावे पूजा प्रार्थना केली जाते .जिवतीची आरती व कहाणी करतात .शुक्रवारी संध्याकाळी आई मुलांना ओवाळते .माझी आई आणि सासूबाई अजूनही आम्ही घरी असू तर आम्हाला श्रावणी शुक्रवारी आम्हा लहानांना ओवाळतात .आता मला मूल झाल्यापासून मीही त्याला ओवाळते आणि जिवतीची पूजा करते .

नारळीपौर्णिमा :

नारळी पौर्णिमा हा खासकरून कोळीबांधवांकडून साजरा केला जाणारा सण आहे .वर्षभर ज्या समुद्रावर त्यांची मदार असते ,ज्यातून त्यांना उत्पन्न प्राप्त होतं.आणि तोच समुद्र त्यांचं कामावर असताना रक्षण करतो .त्यामुळे त्याचा आदर म्हणून किंवा त्याच्या बद्दल प्रेम म्हणून ह्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे .ह्या दिवशी गोडधोडाचा स्वयंपाक केला जातो .बऱ्याच ठिकाणी नारळी भात करण्याची देखील परंपरा आहे .

रक्षाबंधन :

नारळी पौर्णिमेच्या दिवशीच साजरा केला जातो हा सण म्हणजे रक्षाबंधन !!हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही  तर संपूर्ण  देशात साजरा केला जातो .बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन करण्याची प्रथा आहे .रक्षा बंधनाला बहीण भावाला राखी बांधते व औक्षण करते आणि भाऊ तिला ओवाळणी देतो अशी पद्धत आहे.रक्षाबंधना बद्दल बऱ्याच कथा सांगितल्या जातात .असं म्हणतात यमाची बहीण यमी हिने यमाला सर्व प्रथम राखी बांधली .महाभारतात द्रौपदी आपला पदर फाडून कृष्णाला मलमपट्टी करते आणि इतिहासात मेवाडची राणी कर्णावतीने सम्राट हुमायूला बहादूरशहाच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी राखी पाठवली अशी हि गोष्ट आहे .पण गोष्ट काहीहि असो भाऊ आणि बहीण ह्यांच्यातील नातं व प्रेम टिकावं ह्यासाठी रक्षाबंधन साजरं केलं जातं हे निश्चित .

गोकुळाष्टमी :


ह्यालाच कृष्ण जन्माष्टमी असेहि म्हणतात .ह्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला म्हणून हा दिवस अतिशय आनंदात साजरा करण्याची परंपरा आहे .काही ठिकाणी मातीचे गोकुळ बनवले जाते व त्यावर कृष्ण जन्म रेखाटला जातो .व त्याच बरोबर त्याची पूजा करण्यात येते .पाळणे म्हटले जातात .जागरण केले जाते .दहीहंडी बांधली जाते .व सर्व बाळ गोपाळ उत्साहात दहीहंडी फोडतात.

श्रावणी सोमवार :

श्रावणात सोमवार देखील अतिशय महत्वाचे .काही लोक श्रावणी सोमवारी उपवास करतात.शंकराची मनो भावे पूजा करतात किंवा देवळात जाऊन शंकराला बेल आणि पांढरी फुलं वाहून पूजा करतात .काही ठिकाणी विवाहित स्त्रिया शंकराला शिवामूठ देखील वाहतात .आणि सोमवारची कहाणीं करतात .ह्या दिवसात महादेवाच्या देवळात प्रचंड भाविकांची संख्या दिसून येते .

श्रावणी शनिवार :

श्रावणी शनिवार हा देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा दिवस आहे .ह्या श्रावणी शनिवारी शनीची ,काहीजण हनुमानाची तसेच लक्ष्मी नरसिंहाची पूजा करतात .श्रावणात जो कागद लावतात त्यावर नरसिंहाचे चित्र असते.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!