श्रावण मासी हर्ष मानसी

संपादकीय : सखे तुझ्या माझ्या मनीचा श्रावण कसा ??

आषाढाची वारी झाली कि श्रावणाची चाहूल हि लागतेच .निसर्गही उत्सुक असतो ऊन पावसाचे रंग भरायला.आणि आपलं मनही खुलवत असता हिरव्या पिवळ्या कुरणांची स्वप्न.अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नकळत वेगळ्याच जोशात असतात .लहानग्यांना मध्येच पडणाऱ्या उन्हामुळे बाहेर खेळायला जायचा आनंद असतो,शाळेत जाताना पावसाचे चीक चीक कमी झालेली असते .आणि मोठ्यांना कामाच्या गर्ततेतून कुठंतरी वीकएंड वर फिरायला जावं असं वाटत असतं.कॉलेजच्या मुलामुलींचे भिजायला जायचे प्लॅन्स बनत असतात .आणि वृद्ध मंडळी धार्मिक व्रत वैकल्यात मग्न होण्याच्या खुशीत असते.बऱ्याच घरातील बायकांना मंगळागौर ,जिवती ,उपास तपास ह्याची हुरहूरदेखील असते.काही जणींकामाच्या वेढ्यात संस्कृती जपत मार्ग काढण्याच्या विचारात असतात .पण प्रत्येक जण श्रावण ह्या भावविश्वात मग्न असतो.

 

काही श्रावण सरी

मध्यंतरी पुण्यात पाऊस खूप झाला आणि त्यानंतर जरा उघडीप आली तेव्हा परत मुलांना घेऊन आम्ही मैत्रिणी सोसायटीच्या पार्क मध्ये भेटायला लागलो .तेव्हा असाच विषय इकडच्या तिकडच्या गप्पानंतर श्रावण ह्यावर आला.आणि माझ्या अनुभवात आपण आई झालो कि बालपणीच्या आठवणी जास्त निघतात तसच काहीसं आमचं पण झालं.आणि मग गप्पांचा विषय बनला ‘श्रावण’!!मग मला वाटलं असेच इतरजणींचे अनुभव वेचावेत आणि वाचकांसमोर आणावेत.सध्याच्या पिढीतील काही ,जुन्या पिढीतील काहींचे काय विचार आहेत ते मांडावेत .तर चला बघुयात तर !!!

माझ्या आठवणीतील श्रावण

श्रावण महिना सर्व मराठी महिन्यांमधला महत्वाचा महिना. जणू सर्व महिन्यांचा “राजा “. या महिन्याचं धार्मिक महत्व खूप आहे. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन,श्रीकृष्ण जयंती,गोपाळ काला,पोळा असे अनेक छोटे छोटे सण या महिन्यात येतात.तसेच आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं वेगळं महत्व या महिन्यात असतं.प्रत्येक वाराची कहाणी वाचली जाते. बरेचसे लोक या महिन्यात सोमवार,शनिवार उपास करतात.मंगळवारी नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौरीची पूजा करतात.रात्री आजूबाजूच्या बायका -मुलींना बोलावून देवीचं जागरण म्हणून वेगवेगळे खेळ खेळतात.शुक्रवारी सर्व माता, जिवतीचं व्रत करतात.मुलाबाळांच्या सुखासाठी,दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं.जिवतीची पूजा करून पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो.संध्याकाळी सुवासिनींना,कुमारिकांना बोलावून हळदीकुंकू,चणे,दूध दिले जाते.नागपंचमीला नागाचं चित्र काढून पूजा केली जाते आणि नागाला दूध,लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो.रक्षा बंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.      अशा प्रकारे अनेक छोटे छोटे सण तसेच धार्मिक कार्यक्रम या महिन्यात असतात आणि त्या निमित्ताने काठापदराच्या साड्या तसेच दागदागिने घालून एकमेकींकडे जायची संधी बायकांना मिळते त्यामुळे स्त्रियांना हा महिना म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. पूर्वीच्या काळी तर अशा निमित्तानेच बायका एकत्र जमायच्या त्यामुळे या महिन्याचं खूपच महत्व पूर्वी बायकांना वाटायचं.आता जरी काळ बदलला असला तरी श्रावण महिन्याच्या आगमनाची प्रत्येकजण आजदेखील उत्सुकतेने वाट बघत असतोच.

प्राजक्ता गरवारे , Retired Government employee

जिवती आणि मी

श्रावण महिना आला की घरात एक वेगळेच चैतन्य जाणवू लागते. येणाऱ्या सणांची ओढ आणि  जुन्या आठवणींमध्ये मन रमते. 
माझ्या श्रावणातल्या दोन सुखद आठवणी म्हणजे दर वर्षी केलेली सत्यनारायण पुजा आणि दर शुक्रवारी आईने केलेले औक्षण. 
चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण (Aura cleaning) केले जाते. 
लहानपणी त्याची गंमत वाटे, मोठेपणी आईची माझ्यावर किती माया- ह्याचे कौतुक. पण त्याचे खरे महत्त्व स्वतः आई झाल्यावर पटते. कोणतीही आई ही आपुल्या लेकराच्या रक्षणासाठी अतोनात प्रयत्न करते, त्याला जीवापाड जपते. पावसाळ्यात उन कमी असते- अश्या वातावरणात  जास्त रोग राई पसरते- म्हणून अग्नी तत्वासाठी आणि नकारात्मक ऊर्जा लहान मुलांपासून दूर राहाव्यात ह्या साठी ही औक्षणे. आजच्या काळात जरी येत्या पिढीचा ह्या परंपरांवर विश्वास कमी होत असला.. तरी मी नक्कीच हा वारसा पुढे नेउ ईच्छीते. आपुल्या मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी हा खारीचा वाटा.
 
मोनिका नाडकर्णी,  Architecht by Profession
 

श्रावणात डोंगर चढताना

 
श्रावण महिन्याची आपण सगळे खूप आतुरतेने वाट पाहत असतो कारण श्रावणात भरपूर सण आपण साजरे करतो. श्रावणात निसर्गाने हिरवी चादर पांघरलेली असते. ट्रेकिंग प्रेमिंसाठी हा काळ चांगला असतो. सगळीकडे हिरवळ, बऱ्याच ठिकाणी धबधबे असतात, मधेच पाऊस मधेच ऊन ह्या अश्या प्रकारचे उत्तम वातावरण. काही किल्ले असे आहेत की जिथे आपण पावसाळ्यातही ट्रेकिंग करू शकतो. एरवीही ट्रेकिंग करताना आपण काळजी घेतो मात्र पावसाळ्यात ट्रेकिंग करताना विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते कारण सगळीकडे चिखल / निसरडे झालेले असते, चढताना / उतरताना पाय सरकून पडण्याची भिती असते. शक्यतो पावसाळ्यात ट्रेकिंग करताना शुजच वापरावेत, ज्याची ग्रीप चांगली असेल म्हणजे पाय सरकणार नाहीत आणि वाढलेल्या गवतातही चालताना पायांचे प्रोटेकशन होईल. पावसाळ्यात झाडांमध्ये डास भरपूर असतात तसेच अन्य किडे, साप ह्या सगळ्यांपासूनही आपल्याला काळजी घेणे गरजेचे असते. दगडांमधून झीरपलेले पाणी आपल्याला ह्या सीजन मध्ये मिळते जे अतिशय शुद्ध असते, तब्बेतीला अतिशय उत्तम. आपल्याला ह्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची फुले / रानफुले पाहायला मिळतात, ढग उतरलेले असतात, अगदी निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटता येतो. मन एकदम रिलॅक्स / प्रसन्न होते. हा निसर्ग आपल्याला बरंच काही देत असतो आणि तेही फुकट, त्याचा आनंद घेत असताना त्याचे संवर्धन करणे हे आपले काम आहे जे आपण केलेच पाहिजे.
 
सोनिया गरवारे, Share Broker

असा हा श्रावण

श्रावण महिना येणार म्हटलं कि सोवळ्यातील पूजापाठ ,सगळीकडे भक्तिमय वातावरण आणि सर्व मराठी सणसमारंभाची सुरुवात .लहानपणी आई आजी आम्हा मुलांना दर श्रावणी सोमवारी शंकराला न्यायची .दिवस मावळतीला आला कि उपवास सोडून आम्हा सर्व मुलांना गोड धोड खायला मिळेल ह्याचा आनंद असायचा .नागपंचमी आली कि मेहेंदी काढायचा प्रोग्रॅम बनायचा.आई घरात नागोबाची पूजा करायची आम्ही बाहेर पतंग उडवत असायचो .सर्वांची एकमेकांचा पतंग कापायची चढाओढ चालायची.श्रावणी शुक्रवारी आई भावाला ओवाळत असे आणि संध्याकाळी आम्हाला हळदी कुंकूवाला नेत असे .तेव्हा चणे गूळ खायला मिळणार ह्यात आनंद असायचा .त्यानंतर रक्षाबंधन हा सण असतो .ह्या दिवशीची सुट्टी आणि धमाल वेगळीच .भावाला राखी बांधून त्याच्याकडून काय गिफ्ट मिळेल ह्याची आतुरता असायची .मग येणारे गोकुळाष्टमी ,दहीहंडी हे तर सांगायला नकोच .स्वतंत्र्यदिन पण एका सणासारखा साजरा होयचा .त्यातून अधून मधून श्रावणसरी असायच्याच .
लहान मुलांचा आवडता व गृहिणीच्या स्वप्नपूर्तीचा हा श्रावण ,मेंदीच्या पानावरील नक्षीत डोकावतो हा श्रावण ,पावसाच्या सरींमध्ये बरसतो हा श्रावण ,पृथ्वीच्या रेशमी हिरवाईच्या गर्भ श्रीमंतीत लपला हा श्रावण ,असा हा माझ्या आठवणीतील श्रावण !!

प्रणाली गिड्डे , Lecturer by Profession 

 

 

श्रावणमासी हर्षमानसी

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे..

      मला स्वतः ला आवडणारा असा हा महिना… कधी ऊन तरी कधी पाऊस.. दोन्ही ची गम्मत अनुभवता येणारा असा हा महिना..जी व्यक्ती निसर्गावर प्रेमं करते.. ती च्या साठी निसर्गाविष्कार दाखवणारा हा महिना.
मराठी कुटुंबामध्ये ह्या महिन्या ला विशेष महत्व आहे .लहानपणी च्या खूप आठवणी ह्या महिन्याशी जोडलेल्या आहेत.नागपंचमी मधे घरी केलेली दिंड.. गोकुळाष्टमी च्या दिवशी आमच्या चं घराला दोर बांधून फोडलेली दहीहंडी..शाळे मधे असताना श्रावणी शुक्रवार चे हळदी कुंकु.एक एक आठवणी मनात गर्दी करू लागतात. म्हणून चं आतुरतेने वाट पाहत मनात आवडीचे गाणे गुणगुणावे वाटते.
           हसरा नाचरा जरासा लाजरा
           सुंदर साजिरा श्रावण आला
 
श्वेता वैद्य, Share Broker 
 

श्रावण म्हटलं की सगळ्यात आधी तर हेच आठवतं

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

माझी आवडती कविता कारण माझं नाव येतं त्यात 😁
शाळेत आपली नावं कविता, स्तोत्रात आली की मोठं अप्रूप वाटायचं सगळे वाकून वाकून बघायचे 😂 लहानपणीच्या गमतीदार गोष्टी ..

लहानपणी श्रावण आवडायचा कारण सोमवारी शाळा लवकर सुटायची. खर म्हणजे फक्त एकच तास आधी सुटायची पण जग जिंकल्याची भावना यायची. श्रावण सोमवार म्हणजे काय मज्जाच मज्जा. सकाळी साबुदाणा उसळ, बटाट्याची उपासाची भाजी, भगर-आमटी आणि संध्याकाळी गरम गरम जेवण मला ह्या गोष्टी आधी आठवतात.

Vegetarian असल्यामुळे अरे श्रावण आला त्यामुळे हे बंद ते बंद असा काही प्रकार नाही पण कांदा , वांगी वर्ज चातुर्मासात त्यामुळे पोहे खाण्यात मजा यायची नाही.

आता मात्र गोष्टी खूपच बदलल्या आहेत. उत्तर भारतात श्रावणाला सावन म्हणतात आणि त्यांचं आणि आपल्या श्रावणात पंधरा एक दिवसाच अंतर हे ध्यान घराबाहेर पडल्यावर कळलं.

मी काही आई सारखे श्रावण सोमवार करत नाही पण पुढच्या पिढीला सणवार कळावे अस वाटत. त्यांच्या करता का होईना काही सणवार आवर्जून करावे असा वाटत. त्या सण वारांचं ओझं नको वाटायला. आजच्या युगात आपला श्रावण ख्रिस्तमस सारखा लोकप्रिय नसला तरी भारतीय जिथे कुठे आहेत तिथे त्यांच्या त्यांच्या परीने नक्कीच साजरा करतात.

माझ्या मुलाचे अनुभव नक्कीच वेगळे असणार पण मोठे झाल्यानंतर निदान त्याला आपले सण, महिने ह्यांचं महत्त्व जरी कळलं तरी मिळवलं.
आईला post वाचून नक्कीच हायस वाटणार आज 😃

मानसी चौधरी ,Marathi blogger and architect

error: Content is protected !!